सुट्टीच्या दिवसांत बच्चेकंपनीस सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही भूक लागते. भरपूर खेळल्यावर पटकन काहीतरी तोंडात टाकायला हवं असतं. अशावेळी, हवाबंद पाकिटातला आयता खाऊ मुलांना देण्यापेक्षा, घरी बनवलेले अस्सल पौष्टिक पदार्थ देणे केव्हाही उत्तम! त्यासाठीच, आजच्या या रेसिपीज्..

केळ्याच्या चकल्या –

साहित्य

 • १ डझन कच्ची केळी
 • १ वाटी साबुदाणा
 • हिरव्या मिरच्या
 • जिरे
 • मीठ

पाककृती :

1) प्रथम केळी शिजवून घ्यावीत. ती गार झाल्यावर त्यांची साले काढून घ्यावीत. त्यानंतर, मिक्सर किंवा पुरणयंत्रातून केळी बारीक करुन घ्यावी.

2) आता त्यामध्ये, भिजवून घेतलेला साबुदाणा, तसेच जिरे, मीठ व हिरव्या मिरचीची पेस्ट मिसळावी.

3) मिश्रण एकजीव करावे व प्लॅस्टिकच्या कागदावर या मिश्रणाच्या चकल्या पाडाव्यात. छान दोन चार दिवस कडक ऊन्हात या चकल्या वाळवून घ्याव्यात.

मसाला खाकरा :

साहित्य :

 • ३ वाट्या कणिक
 • १ चमचा तिखट
 • १ ते २ चमचे हळद
 • जिरेपूड
 • १/४ चमचा ओवा
 • १/४ वाटी तेल
 • १ चमचा बेसन
 • चवीनुसार मीठ.

पाककृती :

1) सर्व जिन्नस एकत्र करुन तेलाच्या सहाय्याने कणिक वळून घ्यावी. फुलक्यासाठी घेतो तितका गोळा घेऊन त्याची पोळी लाटून मंद आचेवर भाजून घ्यावी.

2) स्वच्छ कापड घेऊन त्याने पोळी दाबावी. ही पोळी हलके हलके डाग पडेस्तोवर अशाप्रकारे नीट भाजून घ्यावी.

मटकी भेळ :

साहित्य :

 • सोलापुरी कुरमुरे
 • शेव पापडी
 • खारीबुंदी
 • शेंगदाणे
 • १ बारीक चिरलेला कांदा
 • १ बारीक चिरलेले टॉमेटो
 • १ लहान काकडी
 • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • १ वाटी वाफवलेली मोड आलेली मटकी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • चमचाभर लिंबाचा रस.

पाककृती :

1) सोलापुरी कुरमुरे, शेव , पापडी, खारीबुंदी, शेंगदाणे, हे सर्व जिन्नस मोठ्या भांड्यात एकत्र करुन घ्यावे.

2) त्यामध्ये शेव, पापडी, खारीबुंदी, तळलेले शेंगदाणे हे पदार्थ जास्त राहतील व प्लेटच्या कडेने कुरमुरे घ्यावेत.

3) दुसरीकडे गॅसवर मोठ्या भांड्यात मटकीचा झणझणीत रस्सा करुन घ्यावा. ही भेळ सर्व्ह करताना प्लेटमध्ये फरसाण असलेल्या भागावर डावभर मटकीचा रस्सा घालावा. आता, वरुन कांदा लसूण मसाला भुरभुरावा, तसेच थोडी शेव, कोथिंबीर, लिंबाचा रस, बारीक चिरलेला कांदा वरुन घालावा.  अशाप्रकारे, मटकी भेळ सर्व्ह करावी.

मंडळी, रेसिपीज कशा वाटल्या जरुर कळवा. तुमच्याकडे अशाकाही उत्तमोत्तम रेसिपीज् असतील, तर जरुर साहित्य, त्याचे प्रमाण, पाककृती व पदार्थाच्या फोटोसहित लिहा comment box.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here