Marathi Kavita (मराठी कविता) on Life | Poems About Life

Published by Uma on

Marathi Kavita on Life

Marathi Kavita (मराठी कविता) on Life | Poems About Life

Thoda Jagla Pahije

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच आहे आळसाने झोपले पाहिजे
गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे

आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या
आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे

भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे
वेडेवाकडे अंग हलवत नाचणं सुध्दा जमलं पाहिजे

गीतेचा रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या
रामायण मालिका नैतिक थोर “बेवॉच” सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे

कधी तरी एकटे उगाचच फिरले पाहिजे
तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे

संध्याकाळी मंदिराबरोबरच बागेत सुध्दा फिरलं पाहिजे
“फुलपाखराच्या” सौंदर्याला कधीतरी भुललं पाहिजे

द्यायला कोणी नसलं म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या

रात्री झोपताना मात्र दोन मिनिटे देवाला द्या
एवढया सुंदर जगण्यासाठी नुसतं थँक्स तरी म्हणा

Jagnyatli Maja Vadvnyache Upay

जगण्यातली मजा वाढवण्याचे तसे बरेच उपाय आहेत
तुम्हीच पहा त्यातले कोणते सहजपणे जगणार आहेत

जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा
अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा

जाणं येणं वाढलं की आपोआप प्रेम वाढेल
गप्पांच्या मैफिलीत दुःखाचा विसर पडेल

महिन्यातून एखाद्या दिवशी अंगत पंगत केली पाहिजे
पक्वानांची गरजच नाही पिठलं भाकरी खाल्ली पाहिजे

ठेचा किंवा भुरका केल्यास बघायचंच काम नाही
मग बघा चार घास जास्तीचे जातात का नाही

सुख असो दुःख असो एकमेकांकडे गेलं पाहिजे
सगळ्यांच चांगलं होऊ दे असं देवाला म्हटलं पाहिजे

एखाद्या दिवशी सर्वांनी सिनेमा पाहावा मिळून
रहात जावं सर्वांशी नेहमी हसून खेळून

काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं
बैठकीत सतरंजीवर गप्पा मारीत बसावं

नवरा बायको दोन लेकरांत “दिवाळ सण” असतो का?
काहीही खायला दिलं तरी माणूस मनातून हसतो का?

साबण आणि सुगंधी तेलात कधीच आनंद नसतो
चार पाहुणे आल्यावरच आकाश कंदील हसतो

सुख वस्तूत कधीच नसतं माणसांची ये-जा पाहिजे
घराच्या उंबऱ्यालाही पायांचा स्पर्श पाहिजे

दोन दिवस का होत नाही जरूर एकत्र यावं
जुने दिवस आठवताना पुन्हा लहान व्हावं

वर्षातून एखाद दुसरी आवर्जून ट्रिप काढावी
त्यांचं आमचं पटत नाही ही ओळ खोडावी

आयुष्य खूप छोटं आहे लवकर लवकर भेटून घ्या
काही धारा काही सोडा सगळे वाद मिटवून घ्या

Aayushyatle Kahi Kalat Naahi

आयुष्यातले काही काळत नाही
कधी कधी दिवाही शांत जळत नाही

सावली देणारेच करतात करार उन्हाशी
पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी

सोबत असणारेच तसे दूर असतात
पाऊलवाटच गुरफटून टाकतात

वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते
नियतीचे गणित कधी मांडता येत नसते

आयुष्यात तसे नसते काही बेतलेले
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले

Aayushya Jasta Sundar Vatta

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तुत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल चित्र पूर्ण करावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पाहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं

आपल्याला कोण हवय यापेक्षा
आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं

Dukhachya Ghari Jamli Hoti Party

दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी
खाऊन पिऊन अगदी मस्त होती कार्टी

दुःख म्हणाले, “दोस्तांनो बिलकुल लाजू नका”
इतके दिवस छळलं म्हणून राग मानू नका

मनात खूप साठलं आहे काहीच सुचत नाही
माझी ‘स्टोरी’ सांगीतल्या शिवाय आता राहवत नाही

ढसा ढसा रडले !

नाशा सगळ्यांची उतरली दुःखाकडे पाहून
दुःखाला ही सुख मिळावे वाटले राहून राहून

सुखाच्या शोधामध्ये आता मी सुद्धा फिरतोय
दुःखाला शांत करायचा खूप प्रयत्न करतोय

जीवनाच्या रथाचे आहेत सुख दुःख सारथी
सुख मिळाले तर दुःखाच्या घरी मीच देईल पार्टी

Kahi Nasnyatch Hota Aanand Motha

आर्थिक स्थौर्य मिळवताना बरंच गणित चुकत जातं
नसण्यातच आनंद असतो हे उत्तर शेवटी हाती येतं

लहानपणी शाळेमध्ये एकच ड्रेस असायचा
खाकी चड्डी पांढरा सादर प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा

पायात चप्पल असणं ही चैनीची गोष्ट असायची
गावात एखाद्या कडेच बाटाची चप्पल दिसायची

रेशनच्या दुकानावर लोकं अनेक चकरा मारायचे
तेव्हा कुठे वायरच्या पिशवीत किलोभर साखर आणायचे

वरच्या वर्गात जाताना पुस्तक जुनेच असायचे
शुभंकरोती आणि बे एक बे मात्र पोरं घरोघरी म्हणायचे

सडा, सारवण, धुणं, भांडी बायकांना तर आराम नव्हता
ज्याच्याकडे पाणी तापवायला बंब तोच सगळ्यात श्रीमंत होता

दिवाळीच्या फराळाला सर्वांनी एकत्र बसायचं
खवट खोबऱ्याच्या तेलामध्ये वासाचं तेल असायचं

कुठला मोती साबण अन कशाची काजू कतली
माया, प्रेम, आपुलकी इतकी की गोड लागायची वातड चकली

भात, पोळी, गोडधोड सणासुदीलाच व्हायचे
वाढलेले गार गरम सगळे आनंदाने खायचे

पिझ्झा, बर्गर, नूडल्स खाणं आजकाल रुटीन असतं
गरिबीला लपवणं कठीणच नाही तर जीवघेणं असतं

स्वयंपाकघर आता भरपूर किराणा मालाने भरलेले असते
खायची आता इच्छाच नाही म्हणून लोणच्याला बुरशी येते

हल्ली आता प्रत्येकाचं पॅकेज फक्त मोठं असतं
दिवाळीच्या दिवशी सुद्धा पॉश घर भकास वाटतं

का बरे पाहिल्यासारखे पाहुणे आता येत नाहीत?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर हेत नाहीत?

काय तर म्हणे आम्ही आता हाय-फाय झालो
चार पैसे आल्यामुळे खरंतर पुरतेच वाया गेलो

कशामुळे घात झाला काहीच का कळत नाही?
एवढं मात्र खरं की पाहिल्यासारखं सुख आता आजिबात मिळत नाही

प्रगती झाली कि अधोगती काहीच उमजेना ?
माणसाला माणसाकडून अजिबात प्रेम मिळेना

अहंकार कुरवाळल्याने प्रेमाचे झरे आटलेत
अन आधार गमावल्यामुळे “सायकियाट्रीस्ट” जवळचे झालेत

भ्रमामध्ये राहू नका जागं व्हा थोडं
मांसाशिवाय माणसाचं सुटत नाही कोडं

Mala Punha Ekda Shalet Jaychay

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय

रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपलं नाव लिहायचय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वाटर बॅग सोडुन नळाखाली हात धरून पाणी प्यायचय
कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकांचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेळायचंय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का हा विचार करत रात्री झोपी जायचय
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
घंटा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचय
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असुदे, जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठीवर वागवायचय
कितीहि उकडत असू दे, वातानुकूलित ऑफिसपेक्षा पंखे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *