असा साजरा करा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

Published by Uma on

यंदा 15 ऑगस्ट 2020 ला देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशासाठी हा दिवस खूप खास आहे आणि आपल्या कुटुंबासाठीही हा दिवस खासच असतो. याच कारण म्हणजे आजच्या पिढीच्या मनावर या दिवसाचं महत्त्व बिंबवण्यासाठी त्यांच्यासोबत हा दिवस साजरा केला पाहिजे. त्यामुळे आपले मित्रमैत्रीण, कुटुंबीय आणि ओळखीच्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर द्याच त्यासोबतच हा दिवस अगदी सणासारखा साजरा करा. 

दरवर्षी 15 ऑगस्टला संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. परंतु सध्या कोरोनाच्या धोक्यामुळे हा दिवस मोठ्या स्तरावर साजरा केला जात नाही. पण तरीही आपण आपल्या घरी किंवा सोसायटीत थोड्या प्रमाणावर का होईना हा दिवस नक्कीच साजरा करू शकतो. या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काही खास गोष्टीतून आपण आपल्या बच्चेमंडळींना स्वातंत्र्याचं महत्त्व पटवून देऊ शकतो. यासाठी खालील टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. 

तिरंग्याने घर सजवा 

तिरंगा रंगातील फुगे, रिबीन्स आणि छोट्या छोट्या झेंड्यांनी आपलं घर सजवा. जसं आपण आपल्या घरातील व्यक्तीच्या वाढदिवसाला घर सजवतो. तसंच या दिवशीही सजवा. यामुळे मुलंही उत्साहीत होतील. कारण आईवडील हेच आपल्या मुलांचे पहिले शिक्षक असतात. जर आपणच पुढच्या पिढीला आपल्या स्वातंत्र्यदिनाचं महत्त्व सांगितलं नाहीतर ते पुढे जाऊन सुजाण नागरिक कसे बनतील. 

ड्रेसकोड ठरवा 

15 ऑगस्टच्या निमित्ताने बऱ्याच सोसायट्यांमध्ये कार्यक्रम असतात. कोरोनाच्या काळातही त्यात फरक पडलेला नाही. थेट नाहीतरी ऑनलाईन ड्रेस कॉम्पिटीशनसारख्या मुलांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. अशा वेळी मुलांसोबत तुम्हीही त्यात सामील व्हा. मुलांसाठी खास या दिवशी साजेसा ड्रेस खरेदी करा. त्यांना छान भाषण किंवा घोषणा लिहून द्या. ज्या व्यक्तीमत्वाचा पोषाख करणार असाल त्याच्याबद्दल मुलांना सांगा. जसं भगत सिंग, महात्मा गांधी किंवा चंद्रशेखर आजाद यांच्यासारखा पेहराव करू शकता. अशा ड्रेसकोडमुळे मुलांचाही उत्साह दरवर्षी वाढेल आणि ते या दिवसाची आतुरतेने वाट पाहतील. 

सोसायटीतील झेंडावंदन 

शाळेत असताना आपल्यापैकी बरेच जण नित्यनेमाने झेंडावंदनाला जात असतील. पण बऱ्याचश्या सोसायटीजमध्येही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आवर्जून झेंडावंदन केले जाते. आता कोरोनामुळे मुलांच्या शाळा तर बंदच आहेत. तर काही सोसायटीजमध्ये संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमांचं पालन करून आणि सोशल डिस्टसिंग पाळून हा दिवस साजरा केला जाईल. अशा वेळी शक्य असल्यास तिथे नक्की हजेरी लावा.  

तिरंगा मिठाई

स्वांतत्र्यदिनाच्या निमित्ताने खास पदार्थही घरोघरी आवर्जून केले जातात. तसंच सोशल मीडियावरही या दिवशी तिरंग्यातील पदार्थ आणि मिठाई यांच्या पोस्टची रेलचेल असते. तुम्हीही घरच्याघरी असा एखादा आपल्या झेंड्याच्या रंगातील पदार्थ आपल्या मुलांसोबत नक्की बनवून पाहा आणि आपल्या स्वातंत्र्याच्या जल्लोषात सामील व्हा. 

देशभक्तीवर आधारित चित्रपट 

आपल्या पुढच्या पिढीमध्ये देश आणि देशाच्या स्वातंत्र्याबद्दल भावना जागृत करण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. सध्याच्या काळात आपल्याकडे देशप्रेमावरील अनेक उत्तम चित्रपट बनवण्यात आलेले आहेत. त्यापैकीच एखादा चित्रपट तुम्ही या दिवसाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबियांसोबत नक्की पाहा. या दिवशी चित्रपट पाहायचा नसल्यास तुम्ही एखादी देशाच्या प्रगतीशी निगडीत डॉक्युमेंट्रीही नक्कीच पाहू शकता. 

देशभक्तीची गाणी 

मला आठवतंय आमच्या लहानपणी 15 ऑगस्टची सकाळ ही देशभक्तीपर गाणाच्या आवाजाने होत असे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोसायटी किंवा मुख्य चौकात देशभक्तीपर गाणी लावली जायची. ती गाणी ऐकून एक वेगळीच उर्जा मिळते. आजची पिढी अशा गाण्यांपासून वंचित आहे. त्यामुळे या 15 ऑगस्टला देशभक्तीपर गीतं तुम्हीही ऐका आणि आपल्या कुटुंबालाही ऐकवा. 

क्राफ्ट आयडियाज 

आजकाल शाळांमध्ये स्वातंत्र्यदिवसाच्या निमित्ताने अनेक क्राफ्ट एक्टीव्हिटीज करायला सांगितल्या जातात. तेव्हा तुम्हीही मुलांसोबत छान छान क्राफ्ट करू शकता. जसं डाळींपासून तिरंगा झेंडा बनवणे किंवा तिरंग्याचं चित्र काढणे. अशा छोट्या छोट्या गोष्टी करूनही आपण आपल्या स्वातंत्र दिवस आणि आपलं बालपण पुन्हा एकदा जगू शकतो. 

पतंगबाजीची मजा 

भारतात अनेक ठिकाणी 15 ऑगस्टच्या निमित्ताने पतंगबाजीही केली जाते. कारण बऱ्याच ठिकाणी या दिवशी पतंग उडवणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो. खरंतर स्वातंत्र्यसैनिकांनी 1927 ला पहिल्यांदा पतंगांच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला होता आणि त्या पतंगांवर लिहीलं होतं सायमन गो बॅक. त्या काळी ब्रिटीश राजवटीला विरोध करण्यासाठी पतंग उडवण्यात आले होते. तेव्हापासून भारतात अनेक ठिकाणी पतंगबाजीची प्रथा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने फॉलो केली जाते. 

सामाजिक सेवा करा 

15 ऑगस्टच्या निमित्ताने तुम्ही हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी सामाजिक सेवाही करू शकता. जसं जे लोक अन्न आणि निवाऱ्यापासून वंचित आहेत. त्यांना पैश्यांनी किंवा इतर प्रकारे मदत करा. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करा. 

वृक्षारोपण करा 

स्वतंत्रता दिवसासारखा चांगला दिवस कोणता असेल वृक्षारोपणासारखं उत्तम करायला. मग या दिवसाचा चांगला उपयोग करून तुमच्या आसपासच्या परिसरात वृक्षारोपण करा. आपली भारतामाता आणि पृथ्वीमाता दोघींप्रती यातून कृतज्ञता व्यक्त करा. 

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *