हंबरून वासराले चाटती जवा गाय

तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय

आया बया सांगत होत्या होतो जवा तान्हा

दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा

पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय

तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

हंबरून वासरले……

कन्याकाट्या वेचायला माय जाय रानी

पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी

काट्याकुट्यालाही तीचे मानत नसे पाय

तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

हंबरून वासरले…

बाप माझ्या रोज लावी मायच्या माग टुमनं

बास झालं शिक्षण आता घेउदी हाती कामं

शिकून शानं कुठं मोठा मास्तर होणार हाय

तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय

हंबरून वासरले….

दारू पिऊन माये मारी जव माझा बाप

थर थर कापे अन लागे तिला धाप

करायच्या दावणीला बांधली जशी गाय

तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

हंबरून वासरले….

बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी

सांग म्हणे राजा तुही कवा येईल राणी

भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय

तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

हंबरून वासरले…

म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी

पुन्हा एकदा जन्म घ्यावं मे तुझ्या पोटी

तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुज पाय

तवा मले पायमंदी दिसती माझी माय

हंबरून वासरले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here