आई म्हणूनि कोणी आईस हाक मारी
ती हाक येई कानी मज होई शोककरी
नोहेच हाक,माते मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी।
हि न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गायी
वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
पाहून अंतररात्मा व्याकुळ मात्र होई
वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही
दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई।
शाळेतून घराला येता धरील पोटी
काढून ठेवलेला घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे,का ह्या करील गोष्टी?
तुझ्याविना ना कोणी लावेल सांजवाती
सांगेल ना म्हणाल्या आम्हा ‘शुभम करोती ‘
येशील तू घराला परतून केधवा गे
दवडू नको घडीला ये ये निघून वेगे
हे गुंतले जीवांचे पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे
रुसणार मी न आता जरी बोलशील रागे
ये रागवावयाहि परी येई येई वेगे